राष्ट्रीय विज्ञान दिन व विज्ञान विषयातील पहिले भारतीय नोबेल पारितोषिक

To read this article in English, please click here

सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांचा जन्म ०७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. प्रकाशाच्या विखुरण्यावरील (scattering of light) त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना १९३० चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञान विषयातील ते पहिले भारतीय नोबेल पारितोषिक विजेते ठरले.



By Nobel Foundation - From Nobel Lectures, Physics 1922-1941, Elsevier Publishing Company, Amsterdam, 1965, Public Domain 


१९व्या शतकात, लॉर्ड रेले यांनी प्रकाशाचे लवचिक विखुरणे (elastic scattering) (photons किंवा प्रकाशकण रूपात) शोधून काढले. हा परिणाम आता रेले स्कॅटरिंग म्हणून ओळखला जातो (आकाश निळे का आहे हे स्पष्ट करणारा परिणाम). या विखुरण्यामध्ये, तरंगलांबीपेक्षा (wavelength) लहान आकाराच्या कणांना धडकून विखुरल्यानंतर आपाती प्रकाशाची तरंगलांबी संवर्धित केली जाते, म्हणजेच तिच्यात बदल होत नाही. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (IACS), कोलकाता येथे रामन यांनी के.एस. कृष्णन व इतर सहकाऱ्यांसोबत प्रकाश विखुरण्याच्या ज्या प्रयोगांचे नेतृत्व केले त्यांचे परिणाम प्रसिद्ध केले. या प्रयोगांमध्ये, रामन यांना काहीतरी वेगळे आढळले. प्रकाशाच्या या विखुरण्यात त्यांना असे आढळले की एकूण आपाती प्रकाशाच्या लहानशा अंशाची (१० दशलक्ष प्रकाशकणांपैकी पैकी ०१) तरंगलांबी आपाती प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा वेगळी आहे. म्हणजेच, अलवचिक प्रकारचे विखुरणे दिसते आहे. या प्रकारच्या प्रकाश-विखुरण्याला आता रामन इफेक्ट (रामन परिणाम) म्हणून ओळखले जाते.

याच रामन इफेक्टवर आधारित रामन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणून ओळखले जाणारे स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्र विकसित केले गेले. रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर रसायनशास्त्रात विविध रेणूंच्या वैशिष्ट्यपूर्ण ठस्यांचा माग काढून ते ओळखण्यासाठी करतात. सामग्रीची सुरक्षितता तपासण्यासाठी जे रामन डिटेक्टर वापरतात त्यांत देखील रामन स्पेक्ट्रोस्कोपी वापरली जाते.

सर सी. व्ही. रामन यांना १९५४ मध्ये भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ भारतात दर वर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.


✍ सोनल थोरवे

Comments