ग्रहणे - आकाशातील लपाछपी

लपाछपी - हा काही फक्त आपलाच आवडता खेळ आहे असं नाही. पृथ्वी-चंद्र-सूर्याला पण तो आवडतो. जेव्हा हे तिघे लपाछपी खेळतात, तेव्हा आपल्याला दिसते 'ग्रहण'. 

तुम्ही पाहिलं असेल, तर चंद्राच्या आपल्याला रोज वेगवेगळ्या *कला दिसतात. याचं कारण, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. या फिरण्याच्या (परिभ्रमण) गतीमध्ये तो कधी पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो (अमावस्या); तर कधी पृथ्वीमागे जातो (पौर्णिमा). हे महिनाभराचे चक्र विभागले जाते दोन भागांत: 

1. पंधरा दिवसांचा शुक्ल (शुद्ध) पक्ष - जेव्हा चंद्र अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कलेकलेने वाढत जातो, आणि

2. पंधरा दिवसांचा कृष्ण (वद्य) पक्ष - जेव्हा चंद्र पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कलेकलेने कमी होत जातो.

ज्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये, एकाच प्रतलात, एका रेषेत पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्र पृथ्वीच्या सावलीत लपल्याने पृथ्वीवरून पाहताना 'चंद्रग्रहण' होते. 

चंद्रग्रहणाच्या वेळी अवकाशातून पाहिल्यास दिसणारी स्थिती 

इतक्यात २६ मे २०२१ रोजी जगाच्या बऱ्याचशा भागांत **खग्रास चंद्रग्रहण दिसले होते. भारतात तेव्हा दिवस असल्याने चंद्र उगवला नव्हता व ते आपल्याकडे दिसले नाही. परंतु, ऑस्ट्रेलिया, हवाई बेटे आदी भागांतून ते दिसले होते.

ज्या अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये, एकाच प्रतलात, एका रेषेत चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. सूर्य चंद्रामागे लपल्याने पृथ्वीवरून पाहताना 'सूर्यग्रहण' होते.

सूर्यग्रहणाच्या वेळी अवकाशातून पाहिल्यास दिसणारी स्थिती

आता १० जून २०२१ रोजी जगाच्या काही भागांत **कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. चंद्राची सावली ही पृथ्वीच्या उत्तरेकडील भागांवर पडणार असल्याने आपल्याकडे ते दिसणार नाही. परंतु, कॅनडा, ग्रीनलँड, रशिया येथील काही भागांतून ते दिसणार आहे.

आता, गंमत अशी की दर पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि दर अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. याचं कारण, चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा ही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेसोबत काही अंशांनी कललेली आहे. आणि याच मुळे, दर अमावस्या-पौर्णिमेला हे तिघे एका सरळ रेषेत येत नाहीत व दर महिन्याला ग्रहणे होत नाहीत.

चंद्र व पृथ्वी यांच्या भ्रमणकक्षा

ग्रहणे ही नेहमी जोडीने येतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेला २ बिंदुंत छेदते. या बिंदूंना आपण 'राहू' व 'केतू' असे म्हणतो. म्हणजे, चंद्र या दोन बिंदूंपैकी एकावर असताना पौर्णिमा किंवा अमावस्या असेल तर ग्रहणे होतात. यामुळे प्रत्येक चंद्र ग्रहणाच्या आधी किंवा नंतर पंधरा दिवसांत जगाच्या पाठीवर कुठे न कुठे सूर्यग्रहण होत असते.

उदाहरणार्थ, 

१८ नोव्हेंबर २०२१ ला होणारे चंद्रग्रहण - ०४ डिसेंबर २०२१ ला होणारे सूर्यग्रहण (ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत).

२५ ऑक्टोबर २०२२ ला होणारे सूर्यग्रहण - ०८ नोव्हेंबर २०२२ ला होणारे चंद्रग्रहण (ही दोन्ही ग्रहणे भारतातील काही भागांतून दिसणार आहेत).

* चंद्राच्या कलांबद्दल माहिती पुढील लेखात 

** ग्रहणाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती पुढील लेखात

✍ सोनल थोरवे 


स्त्रोत व अधिक माहिती:

सर्व आकृत्या साभार - www.timeanddate.com

https://www.timeanddate.com/eclipse/eclipse-information.html

१० जून २०२१ रोजी दिसणाऱ्या सूर्याग्रहणाचे थेट प्रक्षेपण: 

https://www.timeanddate.com/live/eclipse-solar-2021-june-10


Comments