अवकाशातील आतिषबाजी
बरेचदा आपण रात्रीचे आकाश आणि त्यावर
चमचमणाऱ्या चांदण्या न्याहाळत असताना अचानक एखादी चांदणी निखळून पडताना दिसते.
जनसामान्यांच्या भाषेत याला ‘तुटता तारा’ असे म्हणतात; तर खगोलशास्त्रज्ञ याला
‘उल्का’ असे म्हणतात. वर्षातील काही ठराविक रात्री अशाही असतात जेव्हा अशा उल्का
जास्त प्रमाणात दिसतात, या घटनेला ‘उल्कावर्षाव’ म्हटले जाते.
दर वर्षी दिवाळीची आतिषबाजी संपल्यानंतर काही
ठराविक रात्रींस आकाशातील उल्कांची आतिषबाजी पाहण्याची संधी आपल्याला मिळू शकते. यांपैकी
एक म्हणजे 13 – 14 डिसेंबर ची
रात्र. या रात्री ‘जेमिनिड्’ म्हणजेच ‘मिथुनेचा उल्कावर्षाव’ सक्रिय असतो. दुर्बिणीशिवायही
फक्त डोळ्यांना दिसू शकणाऱ्या ह्या खगोलीय घटनेचा आनंद लुटण्यासाठी आपण
उल्कावर्षाव म्हणजे काय हे जाणून घेऊ.
ज्याला आपण तुटता तारा म्हणतो तो खरे तर अवकाशातील
धुलीकण असतो. जेव्हा अवकाशातील एखादा धुलीकण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा
वातावरणासोबत होणाऱ्या घर्षणामुळे तो पेट घेतो व आपणांस तारा निखळल्याप्रमाणे
प्रकाशशलाका दिसते. ही प्रकाशशलाका म्हणजेच उल्का.
अवकाशात हे धुलीकण कुठून येतात?
हे धुलीकण बहुतांश धूमकेतू पासून विलग झालेले कण असतात; तसेच काही वेळा काही
कारणांनी विलग झालेले लघुग्रहाचे तुकडे ही असू शकतात. हे धूमकेतू आणि लघुग्रहांचे
अवशेष काही मायक्रोमीटर आकाराचे कण ते काही मीटर आकाराचे तुकडे असू शकतात.
सर्वसाधारणपणे धूमकेतू हे आपल्या ग्रहमालेच्या बाहेरील क्षेत्रातून, नेपच्यून पलीकडील अवकाशातून
येतात. सूर्यापासून मिळणारी उष्णता दूरच्या अंतरांवर तितकीशी तीव्र नसल्याने धूमकेतू
अतिथंड अशा गोठलेल्या दगडांप्रमाणे असतात. सूर्याभोवतीच्या आपल्या कक्षेत फिरताना
जेव्हा एखादा धूमकेतू सूर्यानजीक येऊ लागतो, तेव्हा सौरवात व उष्णतेमुळे त्याच्या गोठलेल्या
आवरणाचे वाफेत रूपांतर होऊ लागते. धूमकेतूच्या स्थायुरूपी गाभ्यापासून हे आवरण विलग
होऊन सूर्याच्या विरुद्ध दिशेला याचे अवशेष फेकले जातात. यालाच आपण धूमकेतूची
शेपटी म्हणतो. धूमकेतू पुढचा प्रवास करेल तसे त्याच्यामागे त्या कक्षेत विलग झालेले
हे अवशेष राहतात.
हे अवशेष
पृथ्वीकडे कसे येतात?
पृथ्वी सूर्याभोवती
फिरताना जेव्हा अशा अवशेषांच्या पट्ट्यातून जाते, तेव्हा यांतील काही कण
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. वातावरणाशी घर्षण होऊन हे कण पेट घेतात, व
आपल्याला उल्का दिसते. कोणत्याही रात्री अंधाऱ्या ठिकाणाहून निरभ्र आकाशाचे
निरीक्षण केल्यास अवकाशातील असे भटके कण पृथ्वीकडे येऊन एखाद-दुसरी उल्का नक्कीच पाहायला
मिळू शकते.
काही
ठराविक रात्री उल्का जास्त प्रमाणात का दिसतात?
काही धूमकेतू, तसेच लघुग्रह यांच्यापासून विलग
झालेल्या अवशेषांच्या पट्ट्याची घनता जास्त असते. पृथ्वीने अशा क्षेत्रात प्रवेश
केल्यास मोठ्या प्रमाणात हे अवशेष वातावरणात शिरून जास्त उल्का दिसू शकतात. यालाच
आपण उल्कांचा पाऊस किंवा उल्कावर्षाव म्हणतो.
आपण पृथ्वीवरून पाहिल्यास आपल्याला ह्या उल्का एका ठराविक बिंदूपासून येताना
दिसतात. हा आभासी बिंदू म्हणजे रेडीयंट किंवा प्रारंभबिंदू. हा बिंदू ज्या
तारकासमूहामध्ये असल्याचा आभास होतो त्या तारकासमूहावरून उल्कावर्षावाला नाव दिले
जाते. जसे, डिसेंबर महिन्यात दिसणाऱ्या ‘जेमिनिड्’च्या उल्कांचा प्रारंभबिंदू
‘जेमिनी’ म्हणजेच ‘मिथुन’ तारकासमूहात असल्याचे भासते.
खालील तक्त्यामध्ये काही प्रसिद्ध उल्कावर्षावांची थोडक्यात माहिती दिलेली आहे.
उल्कावर्षाव
|
कालावधी
|
सक्रिय
|
ताशी उल्कांचे प्रमाण
|
स्त्रोत
|
क्वाड्रांटीड
|
जानेवारी 1 ते 5
|
जानेवारी 3
|
120
|
लघुग्रह 2003 EH1
|
लायरिड
|
एप्रिल 25 ते 28
|
एप्रिल 22
|
15
|
थेचर धूमकेतू
|
इटा अक्वारिड
|
एप्रिल 19 ते मे 28
|
मे 6
|
60
|
हॅले धूमकेतू
|
एरीटीड
|
मे 22 ते जुलै 2
|
जून 7
|
54
|
मार्स्डेन सनग्रेझिंग धूमकेतू
|
डेल्टा अक्वारिड
|
जुलै 12 ते ऑगस्ट 19
|
जुलै 28
|
20
|
क्रच/माकहोल्झ सनग्रेझिंग धूमकेतू
|
पर्सीड
|
जुलै 17 ते ऑगस्ट 24
|
ऑगस्ट 12
|
90
|
स्विफ्ट टटल धूमकेतू
|
ओरिओनिड
|
ऑक्टोबर 2 ते नोव्हेंबर 17
|
ऑक्टोबर 21
|
20
|
हॅले धूमकेतू
|
जेमिनिड
|
डिसेंबर 7 ते 17
|
डिसेंबर 14
|
120
|
लघुग्रह 3200 फेथन
|
अर्सिड
|
डिसेंबर 17 ते 26
|
डिसेंबर 22
|
10
|
टटल धूमकेतू
|
उल्कावर्षाव पाहण्यात
एक वेगळाच आनंद असतो. आकाशातील नैसर्गिक आतिषबाजी बरेचदा डोळे दीपवते, तर कधी
बरेच कष्ट घेऊन अगदी बोटावर मोजण्याइतक्या उल्कांचे दर्शन होते. डोळे दिपवणाऱ्या
उल्कावर्षावांपैकी एक म्हणजे जेमिनिड् – मिथुनेचा उल्कावर्षाव. शहरापासून 25-30
किलोमीटर लांब अंधाऱ्या जागी गेल्यास एका रात्रीत शंभरहून जास्त उल्का दिसू शकतात.
आकाश निरभ्र असल्यास आपल्या अंगणात, गच्चीवर जाऊन देखील हौशी निरीक्षक जेमिनिड्ची काही प्रमाणात मौज लुटू शकतात.
अतिशय मोजक्या शब्दांत छान माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद !!!
ReplyDeleteसोनल, छान माहिती....आमच्या ज्ञानात भर घालणारी...
ReplyDeleteसोनल ताई,
ReplyDeleteफार सोप्या, सुंदर व आकर्षक शब्दांत शास्त्रीय माहिती दिली आहे. शिवाय ज्ञानात भर घालणारी व अगदी सामान्य माणसाच्या प्रश्नांना उत्तरे देणारी आहे. मी पुढे नक्कीच शेयर करते.